Friday 31 August 2012

संवाद 


कित्येक वर्षांपूर्वी संपर्काची साधने अगदी माफक होती, तेव्हा संवाद जो व्हायचा तो जेव्हाही व्हायचा शुद्ध असायचा . आज मात्र प्रश्न पडतो कि संपर्काची एवढी साधने वाढली असूनही संवाद कमी कसा झाला .

साधीशी गोष्ट आहे . पूर्वी प्रवास करून मजल दर मजल करीत निरोप खुशाली कळवली जायची . लेक सासरी गेली / सून पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी गेली/ नवरा -मुलगा दूरदेशी कामास -नोकरीस गेला असता माणसं जाणार - येणार असल्यासच निरोप घेतले पोहोचवले जायचे . मग पत्रे पाठवली जाऊ लागली . मग ट्रंक कॉल आले . अजूनही जिव्हाळा शिल्लक होता . मग मोबाईल फोन इ . इ ... आता तर ट्रेन मध्ये चार्जींग ची देखील सोय असते जेणेकरून प्रवासामधेच कधी मोबाईल डिस्चार्ज झाला तर संवाद खुन्टायला नको ! इतके कसे आपण उतावीळ झालो?  का आपला शाश्वततेवर - जीवनाच्या संतततेवराचा विश्वास ढळला आहे? आजकाल समाजात असुरक्षितता वाढलीये ते खोटं नाही पण काळजी म्हणून उतावीळता आणि Fad म्हणून असलेली उतावीळता यांत नक्कीच फरक आहे . आणि एवढा असूनही संवाद होतो का? नुसतं हाय हलो, इकडची तिकडची खबरबात विचारताच मैत्री जोडली जाते ... सोशल सर्कल वाढवलं तर जातं हो पण सख्य जपण्याइतकी ती मैत्री खोल असते का? ते कळण्याइतपत वेळ मिळतो का /दिला जातो का की ती मैत्री दोन हृदयांमध्ये रुजेल मुरेल आणि बहरेल ... ? प्रश्न कठीण नाहीये . उत्तरही सोप्पं आहे ...नाही ! वेळ दिलाच जात नाही . एक खूप प्रचलित म्हण आहे . Cinematic language मध्ये तर खूपदा वापरली जाते - "Less is More" कुठलंही माध्यम घ्या - संगीत ,नाटक , सिनेमा ... जेव्हा भावनांच्या अभिव्यक्तीचा प्रश्न असतो तेव्हा कमीतकमी शब्दांत -रंगात -स्वरांत जे उत्तमरित्या होऊ शकतं ते कशानच नाही ! तिथूनच मला वाटतं शालीनता आली . एखाद्या मुलीला मागणी घातली तर पूर्वीच्या सिनेमांमध्ये तिचं केवळ लाजणं अथवा डोळ्यांची भाषा पुरे असे . आजच्या सारखं गाणी गाऊन तिच्या भावनांचा इजहार करायची गरज नसे . पण आज तितकं पुरात नाही . BIG BUDGET हवं ! शास्त्रीय संगीतात रागदारीचं सौंदर्य कसं बरं वर्णावं ? मोजके स्वर आणि वापरण्यात असलेली बंधनं यांतून जे संगीत फुलतं ... ज्या चाली रचल्या जातात त्यांची गोडी कशी बरं सांगावी? असो . थोडक्यात मूळ मुद्यावर वळायचं तर आज Less is More हे आपण सपशेल विसरलोय किंवा कदाचित आपल्या उतावळेपणात गोंधळून More is Less असं  समजून बसलोय . मग यातूनच काय समजायचं ते वाचणार्याने समजून घ्यावे .  

No comments:

Post a Comment