Wednesday 8 August 2012

चारही दिवस दिवाळीचे 
पडला मुसळधार पाऊस
सगळ्यांचा झाला हिरमोड 
पुरी झाली नाही कोणतीच हौस 

अभ्यंग स्नानासाठी 
लागला नाही काहीच वेळ 
पोरांच्या आंघोळी पावसातच झाल्या 
राहिला नाही ताळमेळ 

मंगल वेळी दारोदारी 
झाल्या सुरेख रांगोळ्या 
आली पावसाची सर 
साऱ्या नालीत ओघळून गेल्या 

सुवासिनींनी  मोठ्या हौसेने 
लावल्या कि हो पणत्या 
तोच मेघराजाचा प्रसाद मिळाला 
काय करता? विझल्या बिचाऱ्या...
खट्याळ मुलांनी सरांच्या धोतराला  
फटाक्यांची माळ जोडून पेटविली
पण हवेने फुसक्या झालेल्या माळेने
पोरांची फजितीच केली

आकाशात होणारी रोशणाई
दिसेना कुठेच जोरदार पावसात
ढगांचा  गडगडाट आवाज तर होता
पण दिसली नाही कुठे झगमगती बरसात

हे सारे  बघून दिवाळी अश्शी चिडली
तडतडत्या फुलबाजीसारखी तडतडली
बरी वेळ साधलीस- पावसाला म्हणाली
इतक्या सुंदर सणाची करून टाकलीस की रे होळी

इतका कसा तू धांदरट
पाच दिवस शांत राहायचा होतं-
बोलता बोलता तिचा कंठ फुटला
आणि तोंड तर अगदी काळवंडलं होतं

अखेर पावसाने मौन सोडलं
आगमनाचं कारण स्पष्ट केलं
सगळ्यांनी कान आकाशाकडे वळवले
पावसाने सुरेख सरीबरोबर आपले मत पाठवले

-वर्षोन वर्ष दर वेळी
अगदी थोडक्यात चुकते माझी दिवाळी
म्हणून यावेळी मुद्दामहून आलो
पण तुम्हाला त्याने सजाच मिळाली

आता प्रस्तावना झाली पुरे
मुद्द्याचं बोलतो
हो नाहीतर गप्पांच्या नादात
काम राहायचे अपुरे

दिव्यांच्या झगमगाटाला माझी ना नाही
पण फाटाक्यांशीवाय काय दिवाळी साजरी होतच नाही?
आनंद उधळा पण प्रदूषण नको 
- हे ऐकून  दिवाळी गप्पच झाली की हो! 






No comments:

Post a Comment