Showing posts with label Poems. Show all posts
Showing posts with label Poems. Show all posts

Wednesday, 29 August 2012

कविता
किती सोप्पी
कशी काय विचारता?
शब्दाला जोडा  शब्द
घडावर चढवा घड
शब्दकोष घेऊन बसा
जरा वेचा शब्द अवजड
यमकं जुळवा
ट ला ट अन्
फ ला फ मिळवा
शब्दांना गोंजारा
मांडीवर घेऊन खेळवा
अहो खात्रीने सांगते
कविता तुम्ही रचल सुरेखशी
सारे प्रख्यात कवी पडतील तोंडघाशी
कुणी कवितेचा अर्थ विचारला
 तर म्हणा या आहेत भावना
जणू माझा मन मी मोकळं केलं जगाला
कुणी विचारलं काय आहे आशय ?
तर म्हणा मोठ्या सहजतेने
की कवितेला कशाला हवाय आशय वा विषय
तिला लागत नाही प्रयोजन सुद्धा
लागतं ते फक्त निमित्त


कविता
कित्ती कठीण
लोक म्हणतात कवितेतून होते
भावनांना मोकळी वाट
मनात उठलंय प्रश्नाचं काहूर
म्हणूनच घातलाय हा कवितेचा घाट
पण ...
सुचतच नाही हो काही
मोकळ्या झाल्यात दिशा दाही
एक शून्य उमटलय मनात
अन् एक शब्दही फुटत नाही
उमटतो फक्त एक हुंकार
डोळ्यात चमकतं पाणी
अचानक गर्दी करतात विचार
कुठेतरी पळून जायची इच्छा होते फार
गप्पच रहावसं वाटतं
नको भावनात्मक कविता
किंवा गाणी सुद्धा
आणि व्हावसं वाटतं व्यक्त
राहून अव्यक्त .
A long lost poem which I recently revisited...




Friday, 17 August 2012


. . . . . . . 




रोज दररोज, माझ्या चेहऱ्यावर असतं हसू 
असो घामाच्या धारा किंवा सर्दी वाहो सू सू ...
प्रश्न पडतो कि मी इतकी का हसते ?
कारण मी रोज प्रेमात पडते ...








मी रोज प्रेमात पडते, का प्रेम माझ्यात पडतं ?
नुसत पडून रहात नाही 
उड्या मारतं, ओसंडतं,
हृदयातून बाहेर डोकावतं,
शरीरभर पसरतं...
मग मेंदूत शिरतं 
तिथंच जरा गडबडतं !










मेंदू भयंकर गोंधळतो
प्रेमाचा तो पाठलाग करतो 
इकडून तिकडे तिकडून इकडे 
रस्ते घेत वेडे वाकडे 
दिवसभर चालतो दोघांचा खेळ 
थकून जातात मग पण होत नाही मेळ 
मग माझ्यासमोर येतात दोघं 
मी म्हणते पुरे तुमची सोंगं 
मेंदूची स्वारी परत डोक्यात परतते 
प्रेमाची मात्र हकालपट्टी करावी लागते 








पण जाता जाता मी 
त्याच्या कानात सांगते 
उद्या तुझी बाजू घेईन 
अन गालात हसते 
प्रेमच ते शेवटी 
आशावादी फार 
उद्या परत पडायला 
ते होतं कि तयार!
म्हणूनच रोज माझ्या चेहऱ्यावर असत हसू 
पण प्रेम माझ्यात पडलं बरं का 
मी प्रेमात पडले नाही..
                                                                                            तुम्ही नका बरं फसू !

Friday, 10 August 2012






आजची रात्र झोपूया नको
चांदण्या मोजू, coffee पिऊन
करू घरातच night lamp चा डिस्को
पण खरच आज झोपूया नको



मीच विचारीन प्रश्न, उत्तर देईन मीच
तू बोलशील तेव्हा करणार नाही मधे मिचमिच
तू पी चहा हवा तर, मी पण घालीन दुधात कोको
पण आज खरच झोपूया नको...


 तू शांतच रहा हव तर, पण फोन कट करू नकोस
नको disturbance ची खरखर, range गेली तर परत call कर
मी उद्या फोनमध्ये balance भरेन नक्की, तू काळजी करू नकोस
पण बोलत राहू, झोपुयात नको, कारण तस नाही काही ठोस...



सहजच वाटतंय बोलावसं
गरम आहे अंग, वाटतंय जरा कससं
तू नाहीस इथे म्हणून एकट वाटतय
असा गैरसमज करू नको  

ए... पण please आजची रात्र, झोपूया नको! 
















Wednesday, 8 August 2012

गप्पा गोष्टी


गोष्टी करू आपण
झाडांच्या पक्ष्यांच्या
फुला -फळांच्या
चंद्र -चांदण्यांच्या
तुझ्या माझ्या
गप्पा करू आपण

डाव मांडू विचारांचा
एक एक घर  
पुढे पुढे जाता जाता 
समजून घेऊ एकमेकांना 
देवाण घेवाणकरता करता 

देवाण घेवाण कसली म्हणता ?
विचारांची,शब्दांची, स्वरांची, 
हुंकारांची, भावनांची, नजरांची,
प्रेमाची, हास्याची, रुस्व्याची,
सहवासाची अन सर्वात महत्वाचे म्हणजे 
आयुष्याची 

चल... गप्पा गोष्टी करू आपण 
अस जग jज्यात फक्त आपण दोघे जण
ओळखीचा आहे तिथला कण अन कण
बरोबर असू जिथे क्षण अन क्षण

माझे तुला, तुझे मला 
कळते सर्व न सांगता 
न जाणता न बोलता 
जणू प्रेम अपुले  चंद्रकला 

कधी वाढते कधी लोपते 
जेव्हा असते तेव्हा हसते 
नसते तेव्हाही आशा असते 

माझ्या बंधनात नाहीस तू 
मी तुझ्यात गुंतलेली 
नागमोडी वळणे आयुष्यातली 
तू बाजूस सारून टाकली 
मग तुझी पाटी साफ होते 
गुंतागुंत नसलेली कोरी करकरीत 
मी माझ्या चित्रात निरखून बघता 
दिसतोस तू माझ्या घट्ट कवेत 
  
मी कापले बंध 
मोकळे केले पाश माझ्याच मनाचे 
तुझ्याशी जे होते बांधलेले 
ते एकदाचे तोडून टाकले 

तू नेहमीच मुक्त होतास 
आता मुक्त झाले मी 
गर्दीतही तू दिसत असे खास 
आता फरक झाला आहे कमी 

माझ्या भोवती अनेक चेहरे 
त्यातलाच एक तुझा 
गर्दीतच मिसळले सारे 
एकाच उरला फक्त माझा 

मी घेतली एक झेप 
सारे आकाश व्यापले 
आणिक एक पाउल टाकता 
चंद्र सूर्य झाकोळले 

स्वप्नां मधली स्वप्ने खुळचट 
सत्याच्या मातीत मिळाली 
त्यातून यशाची वेल बहरली 
उंच आकाशास ती भिडली 

आकाशातही स्वप्नेच भेटली 
हरवलेली दिशा पुन्हा गवसली
यांच्याशीच  माझी गाठ पडली 
अन मग काय... गप्पा गोष्टीत पुरी रात सरली 



चारही दिवस दिवाळीचे 
पडला मुसळधार पाऊस
सगळ्यांचा झाला हिरमोड 
पुरी झाली नाही कोणतीच हौस 

अभ्यंग स्नानासाठी 
लागला नाही काहीच वेळ 
पोरांच्या आंघोळी पावसातच झाल्या 
राहिला नाही ताळमेळ 

मंगल वेळी दारोदारी 
झाल्या सुरेख रांगोळ्या 
आली पावसाची सर 
साऱ्या नालीत ओघळून गेल्या 

सुवासिनींनी  मोठ्या हौसेने 
लावल्या कि हो पणत्या 
तोच मेघराजाचा प्रसाद मिळाला 
काय करता? विझल्या बिचाऱ्या...
खट्याळ मुलांनी सरांच्या धोतराला  
फटाक्यांची माळ जोडून पेटविली
पण हवेने फुसक्या झालेल्या माळेने
पोरांची फजितीच केली

आकाशात होणारी रोशणाई
दिसेना कुठेच जोरदार पावसात
ढगांचा  गडगडाट आवाज तर होता
पण दिसली नाही कुठे झगमगती बरसात

हे सारे  बघून दिवाळी अश्शी चिडली
तडतडत्या फुलबाजीसारखी तडतडली
बरी वेळ साधलीस- पावसाला म्हणाली
इतक्या सुंदर सणाची करून टाकलीस की रे होळी

इतका कसा तू धांदरट
पाच दिवस शांत राहायचा होतं-
बोलता बोलता तिचा कंठ फुटला
आणि तोंड तर अगदी काळवंडलं होतं

अखेर पावसाने मौन सोडलं
आगमनाचं कारण स्पष्ट केलं
सगळ्यांनी कान आकाशाकडे वळवले
पावसाने सुरेख सरीबरोबर आपले मत पाठवले

-वर्षोन वर्ष दर वेळी
अगदी थोडक्यात चुकते माझी दिवाळी
म्हणून यावेळी मुद्दामहून आलो
पण तुम्हाला त्याने सजाच मिळाली

आता प्रस्तावना झाली पुरे
मुद्द्याचं बोलतो
हो नाहीतर गप्पांच्या नादात
काम राहायचे अपुरे

दिव्यांच्या झगमगाटाला माझी ना नाही
पण फाटाक्यांशीवाय काय दिवाळी साजरी होतच नाही?
आनंद उधळा पण प्रदूषण नको 
- हे ऐकून  दिवाळी गप्पच झाली की हो!