Wednesday 29 August 2012

कविता
किती सोप्पी
कशी काय विचारता?
शब्दाला जोडा  शब्द
घडावर चढवा घड
शब्दकोष घेऊन बसा
जरा वेचा शब्द अवजड
यमकं जुळवा
ट ला ट अन्
फ ला फ मिळवा
शब्दांना गोंजारा
मांडीवर घेऊन खेळवा
अहो खात्रीने सांगते
कविता तुम्ही रचल सुरेखशी
सारे प्रख्यात कवी पडतील तोंडघाशी
कुणी कवितेचा अर्थ विचारला
 तर म्हणा या आहेत भावना
जणू माझा मन मी मोकळं केलं जगाला
कुणी विचारलं काय आहे आशय ?
तर म्हणा मोठ्या सहजतेने
की कवितेला कशाला हवाय आशय वा विषय
तिला लागत नाही प्रयोजन सुद्धा
लागतं ते फक्त निमित्त


कविता
कित्ती कठीण
लोक म्हणतात कवितेतून होते
भावनांना मोकळी वाट
मनात उठलंय प्रश्नाचं काहूर
म्हणूनच घातलाय हा कवितेचा घाट
पण ...
सुचतच नाही हो काही
मोकळ्या झाल्यात दिशा दाही
एक शून्य उमटलय मनात
अन् एक शब्दही फुटत नाही
उमटतो फक्त एक हुंकार
डोळ्यात चमकतं पाणी
अचानक गर्दी करतात विचार
कुठेतरी पळून जायची इच्छा होते फार
गप्पच रहावसं वाटतं
नको भावनात्मक कविता
किंवा गाणी सुद्धा
आणि व्हावसं वाटतं व्यक्त
राहून अव्यक्त .

No comments:

Post a Comment